शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (15:54 IST)

रामदास कदम – अनिल परब यांच्यातील शीतयुद्धामुळे परिवहन खाते ‘रामभरोसे’; भाजपचा हल्लाबोल

परिवहन मंत्री अनिल परब सध्या कोणत्या वसुलीत गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?, मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम – अनिल परब यांच्यातील शीतयुद्धामुळे महाविकासआघाडीने परिवहन खाते ‘रामभरोसे’ सोडलंय, अशी टीकाही त्यांनी केलीय.

केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) च्या ३०६ कर्मचाऱ्यांचा कोविडमध्ये मृत्यू, २५ कर्मचाऱ्यांची आत्महत्या, पण ठाकरे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय, अशा शब्दांत टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहिमेवर टीका करणारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, असं देखील केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी उपाध्ये यांनी लखीमपूरवरून महाराष्ट्र बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही” असं म्हणत निशाणा साधला होता.