मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (11:04 IST)

रामदास कदम यांची सोमय्यांना मदत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा पुन्हा आरोप

किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. मात्र यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनीच सोमय्यांना माहिती पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. पुरावा म्हणून कदम आणि सोमय्या यांच्यात झालेल्या संभाषणाच्या क्लिप त्यांनी सादर केल्या आहेत.
अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परब यांचं कार्यालय तोडलं जावं, याचाही उल्लेख या ध्वनीफितीमध्ये आहेत.
 
कदम यांच्या आरटीआय कार्यकर्त्यांबरोबरच्या क्लिपही त्यांनी सांदर केल्या. अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंना सांगून मंत्रिमंडळात माझा समावेश होऊ दिला नाही, असा उल्लेखही कदम यांनी एका क्लिपमध्ये केलेला आहे.
 
शिवसेनेतील अंतर्गत वादामुळं स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना त्रास होत असल्याचा आरोप करत संजय कदम यांनी वरिष्ठांकडे सर्व पुरावे सादर केल्याचं स्पष्ट केलं आहे.दरम्यान रामदास कदम यांनी यापूर्वीही त्यांच्यावरचे हे आरोप फेटाळले होते.