शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (14:04 IST)

राणे विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
जामीन मिळाल्यानंतर राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते बुधवारी विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी किंवा शुक्रवारी पुन्हा यात्रा सुरू होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
 
नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे हजारी लावण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी माध्यमांना दिली आहे.
 
तसंच नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्याची ताकीद कोर्टानं दिली आहे. शिवाय पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा आवाजाचे नमुने उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टानं राणेंना दिले आहेत.
 
साक्षीदारांवर दबाव न आणणं तसंच पुराव्यांशी छेडछाड न करण्याची सूचनादेखील कोर्टानं राणेंना केली आहे. रात्री उशीरा राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
 
पोलिसांनी राणेंच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तर राणेंच्या वकिलांनी मात्र त्याला विरोध केला होता. राणेंना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला.
 
दरम्यान मंगळवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीला नकार दिला होता.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीमधून नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांनी अटक केली होती. अटकेनंतर पोलीस राणे यांना महाडमध्ये घेऊन गेले होते.
 
राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत मुंबई-गोवा हायवेवर चक्काजाम करू, असा इशाचा भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिला होता.
 
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
 
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून नारायण राणेंनी केलेल्या विधानावरुन नाशिक शहराचे शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नाशिकमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
महाड, नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आम्ही रत्नागिरी पोलिसांना विनंती केली आहे की त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना अटक करावी आणि आमच्या ताब्यात द्यावं, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितलं होतं.
 
"आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही फक्त कायद्याचं पालन करतो. घटनात्मक पदावर बसलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात तक्रार केली आणि आम्ही त्यावर कारवाई करतोय," असं ते पुढे म्हणाले.
 
दरम्यान मंगळवारी दुपारी रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नाशिक मधल्या केससाठी रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का, असा सवाल विचारत कोर्टानं हा अर्ज फेटाळला आहे. तांत्रिक मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला होता.