बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:12 IST)

सध्या आरआरआर चित्रपटाप्रमाणे राणे, राणा आणि राज हे सूत्र जमले’ भुजबळांची जोरदार टोलेबाजी

chagan bhujbal
जे देशात सत्तेवर आले आहे त्यांनी केवळ विकण्याचा धंदा केला आहे. देशाच्या अनेक संस्था विकण्याशिवाय कुठलही काम त्यांनी केलं नाही. महागाई वाढत असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यासाठी भोंगे पुढे आणले जात असून धर्मधर्मात तेढ निर्माण करण्यात प्रयत्न केला जात आहे. देशात सध्या आरआरआर चित्रपटाप्रमाणे राणे, राणा आणि राज हे सूत्र जमले असल्याची जोरदार टोलेबाजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सटाणा येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, पक्षाची ताकद ही किती लोकप्रतिनिधी निवडून येतील यावर ठरत असते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून द्यावेत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
 
भुजबळ म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण आणि खासदार शरद पवार साहेब यांनी नेहमीच बेरजेच राजकारण केलं आहे. त्यामुळे आपापसातील वाद बाजूला ठेऊन आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक बेरजेच राजकारण करा असे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यासारखे देशव्यापी नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. ज्यांना देशातील सर्व क्षेत्रांची जाण आहे. ते अहोरात्र जनतेच्या हितासाठी काम करता आहे. त्यांचाच आदर्श घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी काम करतात. कुठल्याही पक्षातील पदाधिकारी एवढं काम करत नाही एवढं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी काम करतात याची मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, लोकमान्य टिळक हे बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या विरोधात होते. त्यांनी त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांना पत्र लिहुन तुमच्या शाळेला कौले बसावा मग शिकवा असे पत्र लिहिले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी टिळकांना माझी मुलं भिजली तरी चालतील मात्र ती शिकली पाहिजे असे पत्र लिहिले. हा इतिहास सर्वांनी वाचावा त्यांचे विचार अंमलात आणावे असे त्यांनी सांगितले.