1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:34 IST)

राणे यांनी केलेला 'तो' दावा खोटा, पोलीसांची न्यायालयात माहिती

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. ९ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यानंतर सोडण्यात आलं, असं म्हटलं होतं. मात्र आता राणे यांनी खोटा दावा केला असल्याचं आता पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.
 
“आरोपींना ५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असं खोटं विधान केलेलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
“आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतो. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही,” असेही पोलिसांनी म्हटलं आहे.