सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:17 IST)

संजय राऊतांनी भाजपला विजयाबद्दल मारले असे टोले

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपला विजयाबद्दल काही टोले लगावलेत. पंजाबच्या निकालांकडे आम्ही अधिक गांभीर्यानं पाहतो, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाहसह संपूर्ण भारतीय पक्षानं ताकद लावली. पण पंजाबमध्ये भाजपला एक जागा मिळालीय. सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. कायम अस्वस्थता असते. अशा ठिकाणी भारतीय जनता पक्षानं निवडून येणं गरजेचं असतं. पण त्यांना पंजाबसारख्या राज्यानं का नाकारलं. याच्यावर त्यांना चिंतन करावं लागेल, असंही ते म्हणालेत.
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड असेल ती त्यांचीच राज्यं होती. त्यांनी राखली, त्यात नवीन काय आहे. त्यांनी फक्त ती राखली आहेत. खरी मुसंडी अखिलेश यादव यांनी मारलेली आहे. त्यांच्या जागा तिप्पट झाल्यात. त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चांगली लढत दिली. प्रियंका गांधी उतरल्या होत्या, तुम्ही जिंकलात ते ठीक आहे. त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पराभूत झाले. गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत झाले. भारतीय लोकशाहीत निवडणुका होतात. हारजित होत असते. काल निवडणुका संपल्या, आजपासून कामाला लागलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.
 
पंजाबमध्ये मला चिंता वाटते, कारण तिकडे एखादा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येणं गरजेचं आहे. कारण ते सीमेवरचं राज्य आहे. पंजाब हा पोरखेळ नाहीये. पंजाबच्या जनतेनं भाजपला इतक्या वाईट पद्धतीनं का नाकारलं, याबाबत सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. भाजपला मोठा विजय मिळाला, यूपी त्यांचे राज्य होते, तरीही अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान आहे, या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागणार आहेत. आपण आनंदी आहोत, जिंकणे आणि हरणे हे होतच असते. तुमच्या आनंदात आम्हीही सामील आहोत, असंही संजय राऊत म्हणालेत.