शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (08:31 IST)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर एकनाथ शिंदे दिली ही प्रतिक्रीया

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. यात त्यांनी शिवसैनिक आणि नाराज आमदारांनाही योग्य तो निरोप दिला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख ही दोन्ही पदे सोडण्यास मी तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण प्रत्यक्ष येऊन किंवा फोनवर मला सांगा मी तातडीने राजीनामा देतो, असे उद्धव यांनी म्हटले आहे. आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रीया देतात किंवा त्यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अखेर शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रीया ट्विटरद्वारे दिली आहे.
 
शिंदे यांनी म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे. असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला आहे.
 
शिंदे यांच्या या प्रतिक्रीयेतून हे स्पष्ट होत आहे की, त्यांची भूमिका ही वेगळी आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार चालविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. त्यामुळे ते आता पुढील निर्णय काय घेतात, भाजपसोबत हातमिळवणी करतात की अन्य काही पर्याय निवडतात याकडे सगळ्यांचे लक्ष सागले आहे.