शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (15:37 IST)

१५,५११ हजार पदांची भरती,‘ एमपीएससी’ उत्तीर्ण होऊन ही रोजगार न लाभलेल्यांना दिलासा

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यात लवकरच १५ हजार ५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी केली.
 
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
 
राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी सध्या रिक्त असलेल्या चार सदस्यांच्या जागा ३१ जुलै पूर्वी भरण्यात येणार असून आयोगातील सदस्यांची संख्याही ११ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रलंबित परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याबाबत आयोगास सूचना देण्यात आल्या आहेत. आयोगाकडे विविध टप्प्यांवर प्रलंबित असणाऱ्या सन २०१९च्या तीन परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र ६ हजार ९९८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. तसेच सन २०१९मधील दोन परीक्षांच्या ४५१ पदे आणि सन २०२०मधील आठ परीक्षांमधील १७१४ पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत लवकर करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगानेही पुढील वर्षी होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी घोषित करावे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच उमेदवारांची वयोमर्यादा आणि परीक्षेच्या संधी याबाबतही सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे.
 
होणार काय?
राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील १५ हजार ५११ पदांच्या भरतीस सरकारने मान्यता दिली. २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे.
 
कोणत्या वर्गात किती पदे?
अ वर्ग – ४,४१७
 
ब वर्ग – ८,०३१
 
क वर्ग – ३,०६३
 
एकू ण – १५,५११
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आयोगास सांगण्यात आले आहे. तसेच आयोगाने ज्या सहा परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करून शिफारस के लेल्या ८१७ उमेदवारांना लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे.
 
अजित पवार, उपमुख्यमंत्री