सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:28 IST)

मुंडेवरील बलात्काराचा आरोप रेणू शर्माने मागे घेतला, अजित पवारांनी मांडली अशी भूमिका

गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.  
 
धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावार आली, त्यावरुन नवीन येणाऱ्या 'शक्ती' कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं ते आम्ही दिलंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. जेव्हा धनंजय मुंडेंवर आरोप झाले, तेव्हा सगळीकडे ब्रेकिंग न्यूज सुरू होती. एखादा व्यक्ती राजकारणात काम करत असताना, त्याचं नाव चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण, एखाद्या गंभीर आरोपाने मोठी बदनामी होते, एका झटक्यात लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधकही आक्रमक होतात, महिला संघटना आंदोलन करतात. आता, ज्यांनी मागण्या केल्या, काही आक्रमक विधानं केली त्याला जबाबदार कोण?. महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे, राजकारणात उंची प्राप्त करायला मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे, आरोप करणाऱ्यांनी आणि आरोपानंतर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी विचार करायला हवा, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.