शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (21:17 IST)

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास ,महाराष्ट्रातून या आठवड्यात पाऊस माघारी

rain
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (२० सप्टेंबर) जाहीर केले. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने सर्वांत शेवटी २ जुलैला पश्चिम राजस्थानाच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. त्यानंतरच्या कालावधीत देशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कमी दाबाच्या पट्ट्यांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने मध्य भारत आणि दक्षिणेकडील बहुतांश भागात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसला. या विभागांत सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पाऊस आहे. महाराष्ट्रात मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.