1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (10:22 IST)

ऋतुजा लटकेंना दुसऱ्या फेरीअखेर 12,094 मतं

rutuja latake
संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
 
पहिल्या फेरीत ऋतुजा लटकेंना 4,200 मतं मिळाली असून आता त्या आघाडीवर आहेत.
 
या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झालं होतं.
 
या निवडणुकीच्या काही महिने आधीच शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेवरच दावा केला. हे प्रकरण कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेलं.
 
शिवसेनेत झालेल्या या फुटीचे पडसाद या निवडणुकीवर पाहायला मिळाले. ही निवडणूक कोणत्या चिन्हावर होईल याचा प्रश्न निर्माण झाला. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर दोन्ही गटांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं.
 
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यात आले आणि त्यांना ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे देण्यात आले. त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले.
 
फुटीनंतर मशाल या निवडणूक चिन्हावर उद्धव ठाकरे गट लढवत असलेली ही पहिली निवडणूक आहे.
 
चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गटात लढत होईल असे वाटत असताना शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडल्याचे म्हटले.
 
भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज देखील भरला होता. पण नंतर दिवंगत नेत्याच्या निधनानंतर जर कुटुंबातील कुणी उभे राहत असेल तर त्या विरोधात उमेदवार न देण्याची संस्कृती आहे असं कारण देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले.
 
त्यानंतर या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्या मतदानाचा आज निकाल आहे.
Published By -Smita Joshi