मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (16:19 IST)

‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर, म्हणाले…

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांबाबत काही मुद्दे मांडले होते. या मुद्द्यांवर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. राज्य सरकार, आरोग्य आणि इतर यंत्रणा कसं काम करत आहे, हे मी जवळून पाहतोय. त्यांच्या या कष्टावर राजकीय हेतूने कुणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे वस्तुस्थिती पुढं यावी म्हणून ही पोस्ट लिहल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
 
रोहित पवार म्हणाले, “आजची वेळ ही राजकारण करण्याची नसून या संकटाला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आहे. आज खरंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. मात्र, आजपर्यंत एकाही नेत्याने ते धारिष्ट्य दाखवल्याचं दिसत नाही. पण राज्य संकटात असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी केंद्राच्या ‘पीएम केअर’मध्ये मदत जमा करण्याचं मात्र त्यांनी न विसरता आवाहन केलं.” देवेंद्र फडणवीस यांनी, सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रात, केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्व मदत केल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत रोहित पवार म्हणाले, “करोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता लस वाटपापर्यंत महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच झाला. राज्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असूनही भाजपशासित राज्यांना प्राधान्य देण्यात आलं. केंद्रीय अर्थसंकल्पात ३५००० हजार कोटींची तरतूद असतांनाही आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या राज्यांवरच लसीकरणाचा अधिकचा भार केंद्राने टाकला. पहिल्या लाटेनंतरही केंद्राला निर्णायक धोरण आखायला विलंब लागल्यामुळे पुरेसा वेळ हातात असतांनाही आपली देशाची लसीकरण क्षमता वाढवली नाही. तरीही राज्य शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे.”
 
विरोधीनेते नेहमी राज्य सरकारवर करोना रुग्णांची आकडेवारी लपवल्याचा आरोप करतात. फडणवीस यांनी देखील मुंबईत मृत रुग्णांची आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. हे आरोप फेटाळत रोहित पवार यांनी फडणवीस यांना खोचक सवाल केला आहे. “मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने सातत्याने उपाय योजना करून मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आणला. ज्या राज्याचे आपणही नागरिक आहात त्या राज्यात आणि राजधानीत करोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आपल्याला आनंद देणारी का नाही?”, असा सवाल पवारांनी केला.
 
“भाजपाशासित गुजरातमध्ये १ मार्च ते १० मे २०२१ दरम्यान १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र दिले आणि प्रत्यक्षात मात्र या कालावधीत केवळ ४२१८ मृत्यू करोनाने झाल्याची नोंद केली. पण गेल्यावर्षी याच कालावधीत दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली. तर यंदा तब्बल १.२० लाख मृत्यूचे दाखले अधिक देण्यात आले. याचं गौडबंगाल काय? यावर राज्यातील विरोधी पक्ष गप्प का आहे?” असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे. रोहित पवार म्हणाले “आकडेवारी कमी दिसावी म्हणून महाराष्ट्रात आकड्यांमध्ये फेरफार केलेला नाही. कोणतीही आकडेवारी लपवली नाही. जे सत्य आहे ते स्वीकारून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपलं महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे”