शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (08:03 IST)

पुण्यात पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट; ५४ जणांवर गुन्हा

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे शहर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या युवा संघटनेचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी १० मे रोजी पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. “भाजपाचे पदाधिकारी विनीत बाजपेयी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम्ही ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,” असे सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले.
 
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार भाजपाच्या विनीत बाजपेयी यांनी केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,  त्याआधी ४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांविषयी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कथित बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.