शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:53 IST)

फेसबुक पोस्टवरून रोहित पवार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

“आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादलादेखील भेट देणार आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. अहमदाबाच्या रोडवर डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली काढली जाणार आहे. या रोडलगत काही भागात झोपड्या आहेत. त्या झोपड्या दिसू नये म्हणून अहमदाबाद महापालिका 600 मीटर उंचीच्या भींत उभारत आहे.
 
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडं आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही. उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचीच ही झलक अवश्य पहा, असं फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले.