भीमा-कोरेगाव दंगलीत प्रशासनाची भूमिका संशयास्पद
पुणे : १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा- कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी समाजावर समाजकंटकांनी हल्ला घडवून आणला होता. यामध्ये प्रशासनामधील लोकांनी जाणीवपूर्वक वरपर्यंत माहिती पोहोचू दिली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
या दंगल प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगापुढे आज त्यांची तब्बल २ तास साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर तपशील दिला.
आंबेडकर म्हणाले, भीमा-कोरेगाव दंगलीत संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचे पुण्याच्या पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे. याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. प्रश्न हा आहे की, २८, २९, ३० डिसेंबर २०१७ रोजी पुणे जिल्ह्याच्या २० कि.मी.च्या अंतरावरील लोकांना सांगलीहून ज्यांचे ज्यांचे फोनकॉल आले त्यांची चौकशी झाली पाहिजे.
हे फोन कोणत्या क्रमांकावरून आले, त्यांची संघटना कुठली होती? सांगली जिल्ह्यातून पुण्यात २८, २९, ३० डिसेंबर २०१७ रोजी कोण कोण आले? त्यांनी भीमा-कोरेगावला भेट दिली होती का? त्यांची ओळख काय? या गोष्टी आयोगाने तपासल्या पाहिजेत.