सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (09:28 IST)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली”- चंद्रकांत पाटील

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पाठिंशी घातल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. “एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली,” अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरून पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे.
 
आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो. परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती,” असं पाटील यांनी म्हटलं आहे. “काही पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवादी कट रचणाऱ्यांना किंवा खुनाच्या घटनांमध्ये संशयित आरोपींचे रक्षण करण्यापेक्षा विशेषत: महिलांवरील गुन्हेगारी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? नक्की कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. जनतेला महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.