बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:46 IST)

साई दर्शनाला भारतीय पेहरावात मंदिरात यावे, साईबाबा संस्थानाकडून आवाहन

शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे. अनलॉक अंतर्गत राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.
 
मात्र, तोकडे कपडे खालून साईमंदिरात येऊ नका. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी भारतीय पेहरावात यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत आहेत, अशी तक्रार यापूर्वी काही भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत, साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं.