मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (21:09 IST)

संभाजीराजे भोसले यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी समांतरपणे मराठा आरक्षणाविषयी हालचाल करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दुपारी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चर्चेचा वृत्तांत सांगितला.
 
या भेटीविषयी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीचा देखील दाखला दिला. “राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नातं छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाली”, असं संभाजीराजे म्हणाले.