संभाजीराजे यांचा शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर निशाणा
शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे”असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालय बाहेर मागील सहा दिवसापासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, “सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत प्रकल्प राबविला जात होता. मात्र आता तोच प्रकल्प मागील कित्येक महिन्यापासून बंद असल्याने, त्या प्रकल्प अंतर्गत काम करणार्या सेवकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मागणीसाठी सहा दिवसापासून सेवक सारथी संस्थे बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. मात्र याकडे या महा विकास आघाडी सरकारचे लक्ष नाही किंवा दखल देखील घेतली जात नाही. ही निषेधार्थ बाब असून या प्रश्न मी लवकरच शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पण शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देत असून ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था सुरू केली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे शरद पवार साहेब आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर ही सारथी संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली.