सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (15:36 IST)

Sameer Wankhede: सीबीआयची समीर वानखेडेंच्या घरी छापेमारी

समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआय ने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह 29 ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
 
नेमकं प्रकरण काय?
2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.सीबीआय) विभागाने एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हा भ्रष्टाचाराचा गुन्हा आहे.
 
तसंच, या प्रकरणी सीबीआयच्या पथकाने मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील 29 ठिकाणी छापे टाकले आहेत.समीर वानखेडे यांच्या घरातील प्रिंटरसह काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
यापूर्वी 3 जानेवारी 2022 रोजी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली होती. त्यांना त्यांच्या पेरेंट कॅडरमध्ये परत पाठवण्यात आलं आहे.
 
कस्टम विभागातील 'अप-राईट' अधिकारी, बॉलिवुड कलाकारांवर धडक कारवाई करणारे अधिकारी अशी समीर वानखेडे यांची ओळख आहे. ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये होते.
 
त्यांच्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विविध आरोप केल्यानंतर त्यांच्यावर विभागातर्फे चौकशी देखील लावण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी NCBवर खंडणी वसूल करण्याचे आरोप केले.
 
या प्रकरणी आता समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांची NCBने विभागांतर्गत चौकशी सुरू केलीये.
 
आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला. त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होऊ नये असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.
 
समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले होते.
 
CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.
 
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.
 
भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
 
त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.
 
ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
 
 





Edited by - Priya Dixit