समीर वानखेडे पुन्हा वादात; आता हे आहे कारण
कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामध्ये अनियमितता आढळून आली आहे. या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे आता एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या काॅर्डिलिया क्रूझवर समीर वानखेडे यांच्या पथकाने छापेमारी केली होती. त्यात सुरुवातीला अभिनेता आर्यन खान, अरबाज मर्चंटसह सातजणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पाठोपाठ एनसीबी पंचांनीही पैशांच्या मागणीचे गंभीर आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर केले होते. तसेच आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. याची दखल घेत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती.
दरम्यान, याच काळात वानखेडे यांची बदली करण्यात आली होती. एनसीबी दक्षता समितीच्या पथकाने समीर वानखेडे यांचीही चौकशी केली होती. या चौकशीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी एनसीबीच्या महासंचालकांना सादर करण्यात आला. दरम्यान, पंच प्रभाकर साईलचाही मृत्यू झाला. या पैशांच्या व्यवहाराच्या दिशेने एनसीबीचे विशेष पथक अधिक तपास करीत आहे. त्यामुळे या अहवालातून काय समोर येते याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे. या तपासात वानखेडे पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत.
जबाबात तफावत असल्याचे निरीक्षण
एनसीबीच्या दक्षता पथकाकडून तीन हजार पानांचा चौकशी अहवाल महासंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. या चौकशी अहवालात क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास योग्य झाला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामातही अनियमितता आढळून आली आहे. गुन्ह्याच्या तपासासह अन्य गुन्ह्यातही तफावत आढळून आली आहे. या प्रकरणात ६५ जणांचे चार वेळा जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्या जबाबात तफावत आढळून आली. यात सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद होती. त्याच्यावर विभागीय कारवाई सुरू झाली आहे. तसेच, काही अधिकाऱ्यांची भूमिकाही दोन गुन्ह्यांत संशयास्पद आढळून आली असल्याचेही अहवालात म्हणले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor