शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (10:59 IST)

सांगली दरोडा : सीबीआय अधिकारी बनून आले आणि 14 कोटींचे दागिने लुटले

- सर्फराज सनदी
एक ज्वेलरी शो रुम...
 
कर्मचारी आणि ग्राहक खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होते. अचानक सात-आठ जण शो रुममध्ये येतात आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगतात.
 
त्यानंतर या दुकानातून तब्बल 14 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी होते.
 
हे वाचून स्पेशल स्पेशल 26 हा सिनेमा आठवला?
 
सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून छापे घालायचे आणि चोरी करायची, अशी या सिनेमातल्या टोळीची पद्धत.
 
पण वर सांगितलेली घटना सिनेमाची कथा नाहीये...
 
सांगलीतल्या ज्वेलरी शॉपमध्ये ही फिल्मी स्टाईल चोरी खरोखर झाली आहे.
 
सांगलीतल्या मिरज रोडवरील मुख्य वर्दळीच्या मार्केट यार्डनजिक असणाऱ्या ‘रिलायन्स ज्वेलर्स’ या शोरूमवर दरोड्याची घटना घडली आहे.
 
नेमकं काय घडलं?
रविवारी (4 जून) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘रिलायन्स ज्वेलर्स’मध्ये नेहमीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते.
 
अचानकपणे सात ते आठ इसम तोंडाला मास्क लावून दुकानात आले. त्यांनी दुकानात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही सीबीआयचे लोक असल्याचं सांगितलं.
 
नांदेड इथल्या दरोड्यामध्ये लुटण्यात आलेले सोन्याचे दागिने रिलायन्स ज्वेलर्समध्ये विकण्यात आले आहेत, त्याची तपासणी करायची असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना एका बाजूला घेतलं.
 
सर्वजण एक बाजूला झाले, त्यानंतर या दरोडेखोरांनी आपल्या जवळ असणारी बंदूक काढून शो रूममधील सात ते आठ कर्मचारी आणि इतर ग्राहकांना बंदुकीचा धाक दाखवून मांडी घालून खाली बसवण्यात आलं.
 
कर्मचारी आणि ग्राहकांचे हात प्लास्टिक टेपने बांधलं आणि त्यांच्या तोंडावर प्लास्टिकची चिकटपट्टी चिकटवली.
 
त्यानंतर दरोडेखोरांनी दुकानात असणारे हिरे,सोनं-प्लॅटिनियमचे दागिने अशा मौल्यवान वस्तू त्यांच्याजवळच्या बॅगांमध्ये भरल्या.
 
या ठिकाणी असलेल्या एका ग्राहकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता एका दरोडेखोऱ्याने हवेत गोळीबार केला.
 
ही गोळी दुकानातल्या काचेवर जाऊन धडकली, त्यामध्ये दुकानातल्या काचा फुटल्या आणि या काचेवर पडून ग्राहक जखमी झाला.
 
दरोडेखोरांनी या ठिकाणाहून वाहनातून पळ काढला. पळून जाताना त्यांनी दुकानात असणाऱ्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेले. मात्र यावेळी एक डीव्हीआर मशीन खाली पडली.
 
चोरट्यांनी मग ती तिथेच टाकून पळ काढला. या मशीनमधल्या रेकॉर्डमधूनच चोरीच्या घटनेचा काही भाग समोर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय मिळालं?
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबागसह सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
 
पोलीस अधीक्षक बसवराज तेलीदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने या दरोड्याचा तपास सुरू करण्यात आला.
 
प्राथमिक तपासात सुमारे 14 कोटींचा ऐवज लुटून नेल्याचं समोर आलं आहे. बसवराज तेली यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितलं की, “मिरज रोडवरील ‘रिलायन्स ज्वेलर्स’ शो रूममध्ये दुपारच्या सुमारास हा दरोडा पडला. प्राथमिक माहितीनुसार चारहून अधिक जण असल्याचं समोर आलं आहे. यावेळी दरोडेखोरांनी दुकानातले सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तू लुटनू नेल्या आहेत.
 
संशयितांच्या शोधासाठी सर्व पोलीस यंत्रणा गतीने तपास करत आहे. त्यादृष्टीनं वेगवेगळी पथकं तपासात कार्यरत आहेत. काही पथकं इतर जिल्ह्यात देखील शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.”
 
ज्वेलरी शो रुममध्ये सापडलेल्या डीव्हीआर मशीनमधून चोरीच्या घटनेचा काही भाग समोर आला आहे. या रेकॉर्डिंगमध्ये दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्यावर कशा पध्दतीने कर्मचारी आणि ग्राहकांना बंधक बनवले याचा व्हीडिओ आहे.
 
बंदुकीचा धाक दाखवून कर्मचारी आणि ग्राहकांना अक्षरशः मांडी घालून बसायला लावून, त्यांचे हात बांधून, या सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवण्यापर्यंतचं रेकॉर्डिंग यामध्ये आहे.
 
काही दरोडेखोरांनी चार चाकी गाडीतून, तर दोघांनी दुचाकीवरून पलायन केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं आहे.
 
दरोड्यानंतर कपडे बदलून दुसऱ्या वाहनातून पसार?
सांगली पोलिसांनी या दरोडेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तैनात करून रवाना केली आहेत. हे दरोडेखोर पंढरपूरच्या दिशेने गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती आणि त्या दिशेनेच पोलिसांची पथकंही रवाना करण्यात आली.
 
पोलीस तपासात मिरज पंढरपूर रोडवरील मिरज तालुक्यातल्या भोसेजवळच्या एका शेताजवळ दरोड्यात वापरण्यात आलेली सफारी गाडी आढळून आली आहे.
 
याची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे.
 
या गाडीमध्ये दरोडेखोरांनी वापरलेले दोन रिव्हॉल्व्हर त्याचबरोबर काही कागदपत्रं आणि दरोडेखोरांचे कपडे आढळून आले आहेत.
 
त्याचबरोबर याच मार्गावर चोरट्यांची एक दुचाकी देखील आढळून आली आहे.
 
दरोडयानंतर चोरट्यांनी चारचाकी आणि दुचाकीतून पळ काढल्यानंतर वापरण्यात आलेली वाहनं आणि आपले कपडे बदलले. त्यानंतर ते दुसऱ्या वाहनातून पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू आहे.
 
दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याआधी दोन ते तीन दिवसांपूर्वी या ज्वेलरी शो रुमची रेकी केल्याची माहितीही आता समोर येत आहे.
 
काही दरोडेखोरांनी दुकानामध्ये येऊन सोनं खरेदीच्या बहाण्याने चौकशी केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे.
 
या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या ड्युटी पासून कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेची संपूर्ण माहिती दरोडेखोरांनी गोळा केल्याचंही समजलं आहे.
 
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.