गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (17:10 IST)

संजय राऊतांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांच्या मुलाने माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिलीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिलीय, असा गंभीर आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केलाय.
 
संजय राऊत यांनी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे.
 
संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात असंही म्हटलंय की, माझ्यावर हल्ल्या करण्याची माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे.
 
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "राजा ठाकूर हा जामिनावर सुटलेला गुंड आहे. त्याला ही सुपारी दिलीय. माझी माहिती विश्वसनीय आहे."
 
संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलंय?
संजय राऊत यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "गेली 40 वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणाबरोबर पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात व तसे प्रयत्नही झाले.
 
"मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरीत्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून, मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."
 
यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माध्यमांमध्ये प्रसिद्धीत राहण्यासाठी संजय राऊत ही स्टंटबाजी करतायेत. उरलेल्या शिवसैनिकांना भावनात्मक राजकारणानं फसवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे."
 
"संजय राऊत विषयहीन बोलत असतात. त्यांना गांभीर्य घेण्याचं कारण नाही," असंही नरेश म्हस्के म्हणाले.