गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (15:01 IST)

अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

ajit pawar
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुंबईत भाजपच्या अध्यात्मिक सेलकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
 
अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं. भाजप आणि शिंदे गटाने या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडली आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह आज साताऱयातही अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत. मुंबईत भाजपच्या आध्यात्मिक सेलकडून आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अजित पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor