सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:44 IST)

भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची रब्बीच्या हंगामातील पीके आडवी झाली आहेत. तसेच, कुंभारी व सिपोरा बाजार येथे अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आईचा मृत्यू झाल्यामुळे दोन वर्षांचा चिमुकल्याच्या डोक्यावर मातृत्व हिरावले आहे
 
तालुक्यात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर वादळवाऱ्यासह वीजा कडाडल्या. त्यामध्ये कुंभारी येथील विवाहिता पल्लवी विशाल दाभाडे (21) ही महिला घराजवळील शेतातून घरी येत असताना अंगावर वीज कोसळली. यात ती जागीच ठार झाली.  तिच्या पश्चात पती व दोन वर्षांचा चिमुकला मुलगा असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गनपत कड (38 ) हे गावाजवळील गट क्रमांक 69, या शेतात असताना 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
तसेच भोकरदन, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, पद्मावती, सावंगी, दानापूर, वालसावंगी, आदी परिसरत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor