गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (17:43 IST)

गोदामाईच्या साक्षीने शहीद निनाद यांना अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना शुक्रवारी गोदामाईच्या साक्षीने वीरमाता, वीरपत्नी, वीर पुत्रीने शोकाकुल वातवरणात अखेरचा निरोप दिला आहे. लष्करी इतमामात निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय वायुदलाने मांडवगणे यांना मानवंदना दिली. शहीद जवानाच्या दर्शनासाठी देशभक्तांचा जनसागर उसळला होता. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते यावेळी उपस्थित होते.‘वंदे मातरम’,‘भारत माता की जय’,‘शहीद निनाद अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.युद्धाचे परिणाम किती भीषण होतात हे सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करणाऱ्यांना काहीच ठाऊक नाही असे मत वीरपत्नी विजेता यांनी व्यक्त केले आहे,
 
शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शहीद निनाद यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक झाले, चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरून आले होते आणि अनेकांचे डोळे पाणावले होते.
 
सकाळी ८.३० डिजीपी नगर येथे निनाद याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणले. यावेळी निनाद चे नाते वाईक, परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. गुरुवारी रात्री 9.30 वाजता ओझरला आणल्यानंतर प्रथम एअरफोर्सच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. एअरफोर्स स्टेशन येथे पार्थिव रात्रभर ठेवण्यात आले आणि शुक्रवारी दि.1 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता ते कुटुंबीयांना सोपविण्यात आले. अर्धा तास कुटुंबीयांसाठी दिल्यानंतर जवळच असलेल्या के. के. वाघ शाळेजवळील मैदानावर सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत ते नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर फेम थिएटरमार्गे अंत्ययात्रा द्वारका सर्कलहून अमरधामकडे अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
 
पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लोकप्रतिनिधी, ओझर स्टेशनचे एअर कमाडोर समीर बोराडे, देवळाली एअर फोर्स स्टेशनचे कमाडोर पी रमेश तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही अमरधाम येथे निनाद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लष्करी धून तसेच हवेत फैरी झाडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली. निनाद यांच्या कटुंबियांनी अंत्यसंस्कार केले आहेत.