सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (19:00 IST)

शरद पवार विरोधी पक्षांची बैठक बोलावून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (22 जून) दिल्लीत विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
 
या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
 
लोकसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे.
 
या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मतता बॅनर्जी, उपाध्यक्ष यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, इत्यादी नेते चर्चेसाठी येणार असल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

या बैठकीपूर्वी त्यांनी आज (21 जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
11 जून रोजी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती.
 
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकांमध्येही सहकार्य केले होते. त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 जून) सकाळी साडे अकरा वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
 

या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दूल्ला, संजय सिंह, डी.राजा, न्यायमूर्ती ए.पी.सिंह, करन थापर, जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, के.सी.सिंह, के.टी.एस. तुलसी, संजय झा, इ. नेते, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
 

नवाब मलिक यांनी सांगितलं, "संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत."
 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याकडील माहिती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
 

मलिक पुढे म्हणाले, "उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत."
 

काँग्रेसला बैठकीतून वगळले?
या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. पण काँग्रेसला या बैठकीत बोलवण्यात आलं नसल्याचे समजते.
 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, "याआधी सुद्धा शरद पवार यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. ही चांगली गोष्ट आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारवेळी ते आम्हाला काही महिने आधीच सोडून गेले होते. पण त्यांचे प्रयत्न सुरू राहू देत."