शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (15:53 IST)

पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौऱ्यावर शरद पवार यांचे भाष्य

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं.शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. 
 
यावेळी पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी दिली.त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचंही पवार म्हणाले.
 
पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं.पवार म्हणाले,“पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात.त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही.पण,मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे,त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”,असं पवार म्हणाले.“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले,तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की,माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.