पूरग्रस्त भागात साथीचे आजार रोखण्यासाठी सरकारने उचलली 'ही' पावले
राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तर पूरग्रस्त भागात साथीचे आजार आणि आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय.पूरग्रस्त जिल्ह्यात एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडला आहे. तो कक्ष आरोग्य विभागाशी समन्वय राखत आहे.496 गावांत आरोग्य कॅम्प सुरु केले आहेत. तिथे आरोग्य सेवेचं पथकही दिलं आहे. लहान गावांसाठी 1 डॉक्टर,1 नर्स, तर मोठ्या गावांसाठी 2 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पुराचा विळखा पडलेल्या गावात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे किटकनाशक आणि जंतूनाशक फवारणी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. औषधांसाठी तातडीचा निधी या जिल्ह्यांना दिला आहे. या ठिकाणी लसीकरणाच्या कामावर जास्त भर द्यावा लागणार आहे. हे सगळी जिल्हे कोरोनाग्रस्त आहेत. राज्याच्या पॉझिटिव्हीटी दरापेक्षा या जिल्ह्याचा दर जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या सगळ्या उपाययोजना सुरु ठेवण्यात आल्या आहेत. काल 3.5 लाख लसीचे डोस दिले आहेत. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. मागणी मोठी आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं टोपे म्हणाले.