1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (08:21 IST)

अखेर नाशिकहून गुजरातसाठी बस सेवा सुरु ; जाणून घ्या वेळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून आंतरराज्य जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आले होते. परंतू कोरोना नियंत्रणात आल्याने त्या पुन्हा सुरु करण्यात आले आहे. नाशिकहून गुजरातसाठी जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अखेर सुरू झाली आहे.यामुळे दोन्ही राज्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
राज्यात कोरोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग वाढल्यानंतर मध्य प्रदेशासह गुजरातने एसटी महामंडळाच्या बसेसला त्यांच्या राज्यात येण्यास बंदी घातली होती.  मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली.परंतु, नाशिकपासून जवळ असलेल्या गुजरातमध्ये बस दाखल होत नव्हत्या. याचा मोठा फटका एसटी महामंडळास बसला.प्रवाशीही खासगी वाहनांकडे वळले.
 
या पार्श्वभूमीवर रविवारपासून गुजरातमधील सुरत,वघई,वापी,उनई तसेच अहमदाबाद या शहरांमध्ये नाशिकच्या बस दाखल होणार आहेत. यातील तीन बस नाशिकहून तर,उर्वरित चार बस मालेगाव आगारातून सुटणार आहेत. मालेगावमध्ये असलेल्या सूतगिरणी व्यवसायामुळे मालेगाव गुजरात हे कनेक्शन व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दुसरीकडे व्यापार, उद्योग व नोकऱ्यांमुळे नाशिक व गुजरातचे दळणवळण नेहमीच जास्त असते.एसटी महामंडळाने हळूहळू आपल्या वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या असून, पाचशेच्या घरात बस विविध मार्गांवर धावत आहेत.
 
बसचे वेळापत्रक
 
नाशिक- वापी- ७.००, ८.००, १०.००, १२.००, १५.३०
 
नाशिक- सुरत- १०.३०
 
नाशिक- वघई- १३.००
 
मालेगाव- सुरत- १३.३०
 
मालेगाव- अहमदाबाद- ८.३०
 
मालेगाव- उनई -१३.००