गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (07:23 IST)

Sharad Pawar: शरद पवार आज कोल्हापुरातून कोणाला आव्हान देणार?

sharad panwar
शरद पवारांचा आज कोल्हापूरमध्ये सभा होते आहे. अजित पवारांचं बंड झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी बाहेर पडायचं जाहीर केलं होतं. ते सलग दौरा करत नाही आहेत, पण टप्प्याटप्प्यात सभा होत आहेत.
 
त्यांच्याच पक्षातल्या ज्यांनी बंड करुन पवारांच्या नेतृत्वालाच एका प्रकारे आव्हान दिलं, त्या मतदारसंघांमध्ये ते जात आहे असं दिसतंय. सर्वप्रथम येवल्याला गेले, जो छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे. त्यानंतर बीडला गेले, जिथे धनंजय मुंडेंचा प्रभाव आहे.
 
आता कोल्हापूर, ज्या जिल्ह्यातून शरद पवारांचे विश्वासू म्हणवले गेलेले हसन मुश्रीफ निवडून येतात. 'ईडी'च्या चौकशीच्या फे-यात अडकलेले मुश्रीफही आता राज्य सरकारमध्ये सामील झाले आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर, मग ती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, शरद पवारांचा पहिल्यापासून प्रभाव राहिला आहे. काँग्रेस सोबत आघाडी असताना ही जागा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच पहिल्यापासून लढवते.
 
पण आता राष्ट्रीय स्तरावर 'इंडिया' ही आघाडी असताना आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी असताना' या जागेवर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कसा दावा करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या इथले विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत ते शिंदे गटात सामील झाले आहेत.
 
पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) या जागे वर दावा असल्याने सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा एक अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता आहे.
 
शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल अथवा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल, यांचा कोल्हापुरातून लोकसभेसाठी उमेदवार कोण असा नेमका चेहरा जरी अद्याप समोर नसला तरीही, येत्या 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला होणाऱ्या 'इंडिया' च्या राष्ट्रीय बैठकीअगोदर पवार कोल्हापुरातल्या सभेतून काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरेल.
 
म्हणून आजच्या सभेकडे पवारांच्या राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेला संघर्ष, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण, आणि इंडिया-महाविकास आघाडीतले सुप्त संघर्ष या तीन मुद्द्यांवरून बघावं लागेल.
 
शरद पवार, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण
अजित पवारांचे बंड झाल्यावर शरद पवारांनी या अगोदर दोन विभागांमध्ये सभा घेतल्या. एक येवल्यामध्ये, म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये. दुसरी बीडमध्ये, म्हणजे मराठवाड्यामध्ये.
 
आता तिसरी सभा होते आहे कोल्हापुरात ज्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची भूमिका काय हा निवडणुकीतला एक महत्वाचा घटक कायमच राहिला आहे.
 
अगोदरच्या दोन्ही सभांपेक्षा या सभेचे महत्त्व अधिक असेल कारण पश्चिम महाराष्ट्र. हा भाग कायमच पवारांच्या राजकारणात त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. पवारांचे विरोधक, विशेषतः भाजप कायम त्यांना साडेतीन जिल्ह्यांचे नेते असं म्हणतात. ते जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत.
 
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातून पवारांचे समर्थक असलेले आमदार ते काँग्रेसमध्ये असल्यापासून निवडून येत आहेत.
 
आजही राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्य ताकद ही पश्चिम महाराष्ट्र हीच आहे. त्यामुळे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर इथली जास्तीत जास्त ताकद आपल्या बाजूला खेचण्यात दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आहे.
 
ही फूट स्पष्ट दिसते आहे. बरेचसे आमदार अजित पवारांच्या बाजूला गेले आहेत. बंडानंतर 3 जुलैला जेव्हा शरद पवार कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर गेले तेव्हा, काही आमदार जे शरद पवारांसोबत होते, ते नंतर अजित पवारांच्या गटात गेल्याच्या बातम्याही आल्या.
 
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या या आपल्या पहिल्या सभेतून पक्ष संघटना विशेषतः तरुण वर्ग आपल्याच बाजूला आहे असं शक्ती प्रदर्शन शरद पवार गट करू पाहत आहे. नातू रोहित पवार हे दोन दिवस अगोदरपासून या भागामध्ये फिरुन 'साहेबांचा संदेश' घेऊन या तरुण कार्यकर्त्यांना सभेसाठी गोळा करत आहेत
 
कोल्हापुरात हसन मुश्रीफ हे शरद पवारांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची 'ईडी' चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.
 
मुश्रीफ हे आता अजित पवार यांच्या गटात सहभागी होऊन सरकारमध्ये मंत्रीही झाले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात नवीन फळीतील नेतृत्व पुढे आणणं शरद पवारांसाठी आवश्यक बनलं आहे.
 
जसं बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांचा चेहरा जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून पुढे करणे, धनंजय मुंडेंच्या परळीमध्ये बबन गीते यांना ताकद देणे, असं पवार यांनी केलं तसं, आता कोल्हापुरात ते कोणाला पुढे आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
कोल्हापूर, सांगली, कराड या भागात काँग्रेसचाही मोठा समर्थक मतदार आणि नेते वर्ग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात करून आपला एक प्रभाव वर्ग इथं तयार केला आहे.
 
शिवसेनेचाही इथे एक पारंपारिक मतदार वर्ग आहे. कोल्हापूर आणि शेजारचं हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांचे खासदार हे शिवसेनेचे आहेत. या सगळ्या गर्दीत बंडानंतर पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच ताकदीची परीक्षा सुरू आहे.
 
जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये ही फूट पडली आहे तेव्हापासून शरद पवारांची भूमिका संभ्रमाची आहे असंही म्हटलं जातं आहे. तो संभ्रम कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही आहे.
 
शरद पवार अजित पवारांविरुद्ध कठोर भूमिका घेत नाही असा सूर त्यामध्ये आहे. पण असंही म्हटलं जातं की पवारांची राजकीय खेळी, कृतीत लपलेला संदेश आजवर पश्चिम महाराष्ट्रातला त्यांचा मतदार अनेक वर्षं समजत आला आहे.
 
त्याला आताही तो समजतो आहे की तोही संभ्रमात आहे, हे कोल्हापूरच्या सभेतल्या प्रतिसादावरुन समजू शकेल.
 
लोकसभेसाठी मोर्चेबांधणी
विधानसभा अद्याप दूर आहे, पण सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी मात्र सुरु झाली आहे. भाजपानेही ती राष्ट्रीय स्तरावर सुरु केली आहे.
 
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यनिहाय मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. इकडे 'इंडिया' आघाडीनंही त्यांचे उमेदवार शोधायला सुरुवात केली आहे.
 
महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी'नं ब-याच पूर्वीपासून, कर्नाटक निवडणुका निकालानंतर, 48 जागांच्या वाटपाची चर्चा सुरु केली होती. पण तेवढ्यात 'राष्ट्रवादी'मध्ये बंड झालं आणि गणित फिसकटलं. पण आता पुन्हा शरद पवार आपल्यासोबत आहे हे पाहून महाविकास आघाडीचा उमेदवार शोध सुरु झाला आहे.
 
त्यात कोल्हापूर हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे पूर्वी 'युती'मध्ये शिवसेना आणि 'आघाडी'मध्ये राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवत असे. दोघांनाही इथे यश मिळालं आहे. त्यामुळे कोल्हापूर हा महाविकास आघाडीसाठी पेचाचा मुद्दा बनणार आहे.
 
कोल्हापूरातून पवारांना नेहमी समर्थन मिळालं. एकेकाळी शरद पवारांचे समर्थक असणारे सदाशिवराव मंडलिक इथनं सातत्यानं निवडून आले. पण 2009 मध्ये पवारांनी त्यांना तिकीट दिलं नाही तेव्हा मात्र कोल्हापूरकरांची नाराजी दिसली आणि त्यांनी अपक्ष सदाशिवरावांना निवडून दिलं. पण पुढच्या निवडणुकीत मात्र पवारांच्या पक्षाचे मुन्ना महाडिक निवडून आले.
 
सध्या इथून सदाशिवराव मंडलिकांचे पुत्र आणि शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार आहेत. पण ते शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे जरी 'सध्याजिंकलेल्या जागेवर त्याच पक्षाचा उमेदवार' हे वरवर ठरलेलं सूत्र जरी असलं तरी उद्धव ठाकरेंकडे उमेदवार कोण प्रश्न आहेच.
 
दुसरीकडे पूर्वी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले, एकदा यशही मिळालेले धनंजय (मुन्ना) महाडिक हे आता भाजपावासी झाले आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे उमेदवार कोण हाही प्रश्न आहेच. हसन मुश्रिफांचं नाव पूर्वी पुढे केलं जायचं, पण ते आता पवारांसोबत नाहीत. मग उमेदवार कोण, महाविकास आघाडीसमोरचा गहन प्रश्न आहे.
 
शरद पवारांच्या कोल्हापूरच्या या सभेचं अध्यक्षस्थान कोल्हापूर राजघराण्याचे सध्याचे प्रमुख शाहू छत्रपती यांनी स्वीकारल्यामुळे अचानक त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवलेली असल्यानं त्यांना अनुभवही आहे. शिवाय राजघराण्याचे प्रमुख म्हणून कोल्हापूर आणि परिसरात त्यांचा प्रभाव आहे.
 
पण ते खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? त्यांच्या निकटवर्तीयांना विचारले असता त्यांना अद्याप याचा अंदाज येत नाही आहे. त्यांचे एक पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी स्वत:चा पक्ष आता स्थापन केला आहे तर दुसरे पुत्र मालोजीराजे छत्रपती हेही राजकारणात असतात.
 
जरी या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा असला तरीही कोल्हापूरच्या या भागात कॉंग्रेसही जोरात आहे. नुकतीच त्यांनी एक पोतनिवडणूक जिंकली आहे.
 
सतेज पाटील यांच्यासारखं राज्यस्तरावरचं आक्रमक नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोल्हापूरसाठी कॉंग्रेसलाही विचारात घ्यावं लागेल.
 
भाजपाची ताकद आणि हिंदुत्व
शरद पवारांनी बंडानंतर दौरे सुरु केल्यावर भाजपावर आपल्या सगळ्या टीकेचा रोख ठेवला आहे. भाजपाचं फोडाफोडीचं राजकारण, मोदी सरकारची धोरणं आणि त्यांचे सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न यावर पवारांनी जोर दिला आहे. कोल्हापूरात गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत भाजपाची ताकद नव्हती.
 
पण आता ती वाढली आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचं राजकारण पाहतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्षात आले आहेत.
 
या परिस्थितीत कोल्हापूरात पवार भाजपाविषयी कोणती नवी भूमिका घेतात हे पहावं लागेल. जून महिन्यात कोल्हापूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. औरंगजेबाच्या मुद्द्यावर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सहाजिक आहे याचा परिणाम राजकारणावरही होऊ शकतो. जेव्हा या घटना झाल्या तेव्हा पवारांनी त्याबद्दल जाहीर भूमिका घेतली होती.
 
त्यामुळे या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाहू छत्रपतींचा प्रभाव असणाऱ्या, पुरोगामी चळवळींचा वारसा सांगणा-या कोल्हापूरमध्ये पवार या सभेत हिंदुत्वाच्या राजकारणाबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं असेल. त्याचा परिणाम होऊ घातलेल्या निवडणुकांवर होईल.
 
हेही निश्चित की शरद पवार हे अजित पवार आणि इतर बंड केलेल्यांची नावं घेऊन या सभेत त्यांच्यावर टीका करतील का हेही पाहिलं जाईल. अजून तरी गेल्या दोन सभांमध्ये त्यांनी तसं केलं नाही आहे. पण कोल्हापूर त्याला अपवाद ठरेल का?
 




Published By- Priya Dixit