शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (10:03 IST)

विधानसभा अधिवेशन: शिंदे सरकारची आज पहिली परीक्षा, कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस या नव्या सरकारची आज विधानसभेत पहिली परीक्षा असेल. कारण आज विधानसभेत अध्यक्षांची निवड केली जाणार असल्यानं शिंदे-फडणवीस सरकारला आपल्या बाजूला बहुमत गाठणारं संख्याबळ दाखवावं लागणार आहे.
 
गेल्या 11 दिवसात सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत बंडखोर आमदार अखेर मुंबईत दाखल झालेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 39 शिवसेनेचे बंडखोर आमदार, तर 7 अपक्ष बंडखोर आमदार आहेत.
 
गुवाहाटीहून गोव्यात दाखल झालेल्या या बंडखोर आमदारांना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत घेऊन आले. मुंबईतील ताज प्रेसिंडेट हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबले आहेत.
 
बंडखोर आमदारांच्या प्रवासादरम्यान कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांचा विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
आज-उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन
महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आल्यांनतर राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आलं आहे.
 
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी 3 जुलैला होणार असल्याचं विधान मंडळ सचिवालयानं कळवलं आहे.
 
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.
 
महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार
विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज मुंबईत झाली. त्यात राजापूर मतदार संघातले शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
 
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे होते. पण सध्याच्या सत्तासंघर्षात ते शिवसेनेला देण्यात आले आहे.
 
भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवार
भाजपकडून राहुल नार्वेकर यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत.
 
नार्वेकर हे देखील एक काळी शिवसेनेत होते. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.
 
शिवसेनेकडून व्हिप जारी
सुनील प्रभू यांनी 3 लाईन व्हिप जारी केला आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप लागू असेल. राजन साळवी यांना मतदान करण्याचे व्हिप जारी केलं आहे. जे करणार नाहीत त्यांच्याविरोधात पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
 
3 लाईन व्हिप गंभीर मानला जातो. हा व्हिप जारी केल्यास थेट अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.
 
महाविकास आघाडीकडून राज्यपालांवर टीका
महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालाकडून विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर त्याही वेळी टीका करण्यात आली होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, "आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे."