1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (07:55 IST)

मंत्रिमंडळात दांडीबहाद्दर मंत्र्यांची यादीत शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आघाडीवर

जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मंत्री वारंवार दांडी मारतात. यातच एक नगर जिल्ह्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख दांडीबहाद्दर मंत्र्यांत आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त दोन वेळा गैरहजर राहिले असताना महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे मंत्री मात्र वारंवार गैरहजर राहत असल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उघड झाले.
 
माहिती अधिकारात अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या बैठकांना सर्वाधिक दांड्या या शिवसेनेचे उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी मारल्या. आतापर्यंत बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकांना एकाही मंत्र्याने शंभर टक्के हजेरी लावलेली नाही हे विशेष. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदासह काही महत्वाची मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला, तर राज्याच्या तिजोरीसह गृह, जलसंपदा व अन्य खाती राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याकडे ठेवली. काँग्रेसकडं महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचा कारभार आला. अनेकांनी आपली शक्तीपणाला लावून मंत्रिपद मिळवले; पण मंत्रिपद पटकावण्यासाठीचा उत्साह पुढे राज्यातील जनतेसाठी काम करताना काही मंत्र्यांच्या बाबतीत कायम राहिला नाही.
 
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सर्वाधिक उपस्थिती असून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे ८,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ७, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ७, वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख ७, माजी गृहमंत्री अनिल देशमुख ६, गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड ५, उद्योग मंत्री सुभाष देसाई ५, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ४, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोन बैठकांना गैरहजर होते.