शिवसेनेचा ‘युपीए’तील सहभाग निश्चित; सोनिया गांधींच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
शिवसेना आता युपीएत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याचा मुहूर्तदेखील समोर आला आहे. शिवसेना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युपीएत सहभागी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युपीएत सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत देखील हजर होते, अशी माहिती समोर आली होती. त्यावेळी संजय राऊत आणि सोनिया गांधी यांच्यात युपीएत सामील होण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीनंतर आता शिवसेना यूपीएत कधी दाखल होणार? याचा मुहूर्तच समोर आला आहे. शिवसेना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यूपीएत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार, सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. राज्यात ज्याप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्रात यूपीएचं सरकार स्थापन व्हावं यासाठी या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचसाठी युपीएला ताकद देण्याचा काम शिवेसेनेच्या माध्यमातून होणार आहे.