शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल
धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदेंना मिळणार की ठाकरेंना याचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्याजवळील पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे पक्षातंर्गत निवडणुका घेऊन पुन्हा हे पद स्वत:कडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्यात आता शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल असं विधान आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
आमदार संतोष बांगर म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची जी निवड आहे त्यात महाराष्ट्राचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर ते आम्हाला निश्चितपणे आवडणार आहे. धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor