प्रताप सरनाईकांकडून तब्बल “इतके” तोळे सोने तुळजाभवानीला अर्पण
तुळजापूर : शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. अशातच सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळ सोने अर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसह तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले आहे. नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचे प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
त्यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसेच दोन्ही नातवंडांचे जायवळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असे म्हटलो होतो.
पत्नीनेच साकडे घातले असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरे बंद होती, तसेच इतर संकटे आमच्यावर होती त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो आहे. मी प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेले नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor