मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (09:09 IST)

नाशिक मध्ये शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला काळे फासले

नाशिक शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या फलकावरील आमदार सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या नावांना शिवसेना महिला आघाडीकडून काळे फासण्यात आले.

दादा भुसे आणि कांदे यांच्या विरोधात यावेळी महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये ही घटना घडलीय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून दोन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.काल नाशिकरोड येथील शिंदे यांच्या बॅनरला काळे फसल्याची घटना घडली होती. आज पुन्हा शिवसेना महिला आघाडीकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील फलकावर असलेल्या दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या नावाला काळे फासले आहे. त्यामुळे शहरात आता शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना असं बॅनरवार पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसैनिक आणि बंडखोर आमदार समर्थक आक्रमक झाले आहेत. कालच्या घटनेनंतर शिवसैनिकांकडून कार्यालय फोडण्यात येणार असल्याची  माहिती मिळताच कांदे समर्थक आक्रमक झाले होते. यामुळे शहर पोलिसांचा फौजफाटा सकाळपासून तैनात होता. त्यामुळे शिंदे समर्थकांकडून बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुहास कांदेच्या नावाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परीसरात असलेल्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

नाशिकमध्ये शिंदे सेना आणि शिवसेना  समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांकडून याला विरोध दर्शवत दोन्ही गटांकडून लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासले येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे नाशिकमध्ये देखील पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. नाशिकमध्ये शिवसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड यावेळी म्हणाले, “शिवसेनेतून बंड करून गेलेले सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे हे गद्दार असून त्यांचा विचार करण्याची गरज नाही. हे सगळे अनपेक्षित असून उद्या या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.