माघ द्वादशीला अर्थात उद्या श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर बंद राहणार
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना उद्या बुधवारी (24) श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या माघ द्वादशी बुधवारी देखील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
माघी दशमी सोमवार आणि एकादशी मंगळवार (ता. २२ आणि २३) असे दोन दिवस श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काल सोमवारी आणि आज मंगळवारी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे उद्या (बुधवारी) माघ द्वादशी दिवशी देखील मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढला असून त्याविषयी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीला कळविण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर २२ व २३ तारखेला बंद ठेवण्यात आले असून, उद्या (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशीही मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.