गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (16:16 IST)

सिंधुदुर्ग बँक: नारायण राणे- सर्वांना पुरुन उरलोय, आता लक्ष्य राज्याची सत्ता

Sindhudurg Bank: Narayan Rane-All is left
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं पॅनल विजयी झालं आहे. भाजपनं 11 जागांवर जिंकत बँकेवर सत्ता मिळवली, तर महाविकास आघाडीचं पॅनल 8 जागा जिंकू शकलं.
भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदार नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत कामाला आल्याचं प्रतिपादन नारायण राणेंनी केलं.
यावेळी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्याबाबत विचारलं असता, ते संतापले. त्यांनी नितेश राणेंवरील गुन्ह्यासंदर्भात बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
"सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार. राज्यात लोकांना भाजपची सत्ता हवीय, 'लगान'ची टीम नको," असा टोला राणेंनी लगावला.
"कुठल्याही चौकशांना मी घाबरत नाही. सर्वांना आतापर्यंत पुरुन उरलोय," असंही राणे म्हणाले.
 
"या निवडणुकीत पोलीस यंत्रणेचा वापर करण्यात आला. तीन पक्ष एकत्र आहेत. अर्थ खात्याचे मंत्रीही आले. पण सत्ता घालवून गेले," असं म्हणत राणेंनी अजित पवारांना टोमणा मारला.
राजन तेली यांच्या पराभवावर बोलताना राणे म्हणाले, राजन तेली यांची योग्य ठिकाणी वर्णी लावणार.
 
दरम्यान, नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, पाहणं महत्वाचं ठरेल.