आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला, वार्षिकोत्सव यंदा मर्यादित स्वरूपात
सिंधुदुर्गातील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे. दरवर्षी कोकणवासीयांसाठी भराडी देवीची यात्रा पर्वणी असते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा यंदा ६ मार्च २०२१ ला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यंदा मर्यादित स्वरूपात साजरा होणार आहे.
या यात्रेला फक्त आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीकर यांचीच उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या यात्रेला भाविकांनी येऊ नये, आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेला नमस्कार करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीयांने केले आहे.
कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आंगणीवाडीकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात यात्रा पार पडणार आहे, अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली. आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थित यात्रा पार पडणार आहे. भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत, भाविकांना नम्र विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री. देवी भराडी मातेस आपले सांगणे सांगावे, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असे आंगणे कुटुंबीयांनी म्हटले आहे.