तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास मज्जाव, 8 ते 11 डिसेंबरपर्यंत त्यांना शिर्डीमध्ये येता येणार नाही
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना शिर्डी येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील विवादित फलक स्वत: येऊन काढण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिलेल्या नोटिशीनुसार 8 ते 11 डिसेंबरपर्यंत त्यांना शिर्डीमध्ये येता येणार नाही. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
साई मंदिरातील तो फलक काढून टाकण्याचे आवाहन देसाई यांनी केलेले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय. तसेच, जर साई संस्थानने तो फलक काढला नाही; तर आम्हाला येऊन त्याला काढावे लागेल, असा ईशाराही देसाई यांनी साई संस्थानला दिलेला आहे.