बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (09:51 IST)

तृप्ती देसाईंना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांची ‘चलो नगर’ मोहीम

इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्यातच उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. इंदूरीकरांची कीर्तनं महाराष्ट्रात गाजतं. लोकांना चुरचुरीत शब्दांत सांगणं ही महाराजांच्या कीर्तनाची खासियत. याच नादात इंदुरीकर महाराज मुलगा कसा होईल ते सांगून बसले.  महाराजांच्या याच धड्याविरोधात आता अंनिसनं नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
 
इंदूरीकर महाराजांविरोधात तृप्ती देसाईंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याही मंगळवारी नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांनीही चलो नगर अशी मोहीम हाती घेतली आहे. बीडमध्ये इंदूरीकर महाराजांचं रविवारी कीर्तन झालं, त्याही वेळी त्यांचं जंगी स्वागत झालं आणि कीर्तनात आय सपोर्ट इंदुरीकर असे बोर्डही झळकले. पण मोर्चा, निषेध आंदोलनं करू नका, असं पत्र इंदुरीकरांनी समर्थकांना लिहिलंय. दुसरीकडे भाजपनंही या वादात उडी घेतली आहे.
 
खरं तर समाजप्रबोधन हे कीर्तनकाराचं काम… पण आता वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे इंदुरीकर महाराजांचे समर्थक आणि तक्रारदार अशी रस्त्यावरची आणि सोशल मीडियावरची लढाई सुरू झाली आहे. कीर्तनासंदर्भातला महाराष्ट्रातला हा नवाच पायंडा म्हणावा लागेल.