मंत्रिमंडळ विस्तारावर संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे समर्थकांची नाराजी
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
भोर मतदारसंघातून थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्यानं संतप्त समर्थकांनी काल भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती.
मंगळवारी (31 डिसेंबर) संध्याकाळी 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
दरम्यान, या प्रकरणावर थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं, "या प्रकाराची मला माहिती नव्हती, पक्षाचा निर्णय मान्य आहे. कोण कार्यकर्ते आहेत, याची मीही माहिती घेतोय. मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील."
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. यामध्ये काँग्रेसच्या सोलापूर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माजलगावचे काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावाचा समावेश आहे.