रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (15:30 IST)

सोलापूर : भाड्याच्या खोलीत 32 महिलांचे गर्भपात; खासगी नर्सला पोलिसांनी कसं पकडलं?

crime
भाड्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे 32 महिलांचे गर्भपात करण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमधून उघडकीस आला आहे.याप्रकरणी बार्शी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात काही महिलांचाही समावेश आहे.यातल्या 3 आरोपींना अटक करुन बार्शी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
सुषमा किशोर गायकवाड (नर्स), उमा बाबुराव सरवदे (खासगी दवाखान्यातील मावशी), राहुल थोरात या तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
तर नंदा गायकवाड, दादा सुर्वे, सोनू भोसले, सुनिता जाधव आणि सोनोग्राफी करणारा डॉक्टर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी कसा लावला छडा?
सुषमा किशोर गायकवाड ही 40 वर्षीय महिला एका खासगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करते.
 
तिनं बार्शी येथे भोईटे कन्स्ट्रक्शन अपार्टमेंटमध्ये एक खोली भाड्याने राहण्यासाठी घेतली होती. याच खोलीत ती गोळ्या देऊन बेकायदेशीर महिलांचा गर्भपात करायची.
 
बार्शीतील या ठिकाणी बेकायदेशीरपण गर्भपात केला जात आहे, अशी माहिती 22 जुलै रोजी पोलिसांना मिळाली.
 
यानंतर बार्शी पोलिसांची टीम दोन पंचांसह रात्री सव्वा आठ वाजता या ठिकाणी पोहचली. दरम्यान, 9 वाजता एक महिला संशयितरित्या हातामध्ये पिशवी घेऊन या खोलीमध्ये शिरत असल्याचं पोलिसांना दिसलं.
 
पोलिसांनी या महिलेचा पाठलाग केला. ती ज्या खोलीत शिरली तिथं चार महिला दिसून आल्या. त्यापैकी एक महिला बेडवर झोपलेली होती.
 
तिच्या शेजारी तीन महिला उभ्या होत्या. बेडवर झोपलेल्या महिलेनं ती गर्भपात करण्यासाठी आल्याचं पोलिसांना सांगितलं.
 
त्यानंतर उभ्या असलेल्या इतर दोन महिलांनी पोलिसांना त्यांची नावे सांगितली. सुषमा किशोर गायकवाड आणि उमा बाबुराव सरवदे अशी त्यांची नावं आहेत.
 
पोलिसांना घटनास्थळी गर्भपातासाठीची कीट, इंजक्शन आणि औषधी गोळ्या आढळल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत 6 हजार 106 रुपये एवढी आहे.
 
पोलिस चौकशीत काय समोर आलं?
गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला औषधं देण्यात आल्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला. यावेळी पोलिसांसोबत आलेल्या डॉक्टरांनी 108 रुग्णवाहिका बोलावून तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
 
तिथं काही वेळातच या महिलेचा गर्भपात झाला. ते स्त्री भ्रूण होतं.
 
गर्भपात झाल्यानंतर या भ्रूणाचा मृत्यू झाला. सदर महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रवाना करण्यात आलं.
 
दरम्यान, या प्रकरणातील नर्स सुषमा गायकवाड आणि उमा सरवदे यांची पोलिसांनी चौकशी केली.
 
त्यावेळी त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, “सदर महिलेला गर्भपात करायचा होता. तिला सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरनं स्त्री गर्भ असल्याचं सांगितलं होतं.
 
“आम्ही गर्भपात करण्याच्या उद्देशानं तिला या ठिकाणी तिला आणलं आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या."
 
“आम्ही जवळपास 6 महिन्यांपासून गर्भपाताचे काम करत आहेत. एजंट दादा सुर्वे याने आत्तापर्यंत पाठवलेल्या 15 ते 20, एजंट सोनू भोसले याने पाठवलेल्या 5 ते 7 आणि एजंट सुनिता जाधवने पाठवलेल्या 4 ते 5 गर्भवती महिलांचा आम्ही गर्भपात केला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
 
त्यांनी जबाबात पुढे सांगितलं की, “नंदा गायकवाड नावाच्या महिलेनं देखील आम्हाला गर्भपात करण्यासाठी मदत केली आहे. तसंच गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्यांवर बंदी असल्यानं आम्ही राहुल बळीराम थोरात याच्याकडून त्या गोळ्या लपून घेत होतो.”
 
या जबाबावरून पोलिसांनी सुषमा किशोर गायकवाड, उमा बाबुराव सरवदे, नंदा गायकवाड, एजंट दादा सुर्वे, एजंट सोनू भोसले, एजंट सुनिता जाधव, राहुल बळीराम थोरात आणि सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टर (ज्यांचे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
भारतीय दंड संहितेच्या कलम 313,315,316,34 आणि गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 चे कलम 4, 5 (2), (3), (4),6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बार्शीचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास चालू असल्याचं कर्नेवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
नागरिकांनी बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करू नये, गर्भपात करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
 





Published By- Priya Dixit