शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (16:01 IST)

सोमय्यांनी भ्रष्टाचाराविषयी आवाज जरूर उठवावा, मात्र नौटंकी करू नये : अनिल परब

किरीट सोमय्या यांनी आरोप करण्यापूर्वी माहितीची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविषयी जरूर आवाज उठवावा, मात्र सगळ्यांचेच भ्रष्टाचार बाहेर काढले पाहिजे. उगाच राजकीय नौटंकी करू नये, असा आरोप करीत सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला नसल्याचा दावा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.
 
मालेगाव येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर थेट टीका केली. भ्रष्टाचारप्रकरणी आलेल्या माहितीची अगोदर शहानिशा करून त्यांनी आरोप केले पाहिजेत आणि खरेच त्यांना भ्रष्टाचार उघड कारायचे असतील तर त्यांनी इतर लोकांच्या भ्रष्टाचारावरदेखील बोलेल पाहिजे. हा माझा, हा त्याचा असे करून राजकीय नौटंकी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
 
सोमय्या यांच्यावरील कथित हल्ल्याविषयी बोलताना परब यांनी घटनेनंतर मला याबाबतची माहिती मिळाली, असे सांगताना त्यांना शारीरिक अशी कोणतीही मारहाण शिवसैनिकांनी केलेली नाही. ते स्वत: पायरीवरून पडले असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. तपासात सत्य समोर येईलच. कोणत्याही घटनेचे राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मिळालेल्या माहितीची सत्यता पाहूनच त्यांनी बोलले पाहिजे, त्याविषयी त्यांनी इतरांचेदेखील म्हणणे ऐकले पाहिजे, असा सल्ला देतानाच राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा पुनरुच्चार केला.