1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (10:07 IST)

'सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं' - रामदास आठवले

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात मग सोनिया गांधी सुद्धा 17 वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या,असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.
 
2004 साली यूपीएला बहुमत होतं त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवं होतं असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.

भारतीय वंशाची महिला अमेरिकेत उपाध्यक्ष होऊ शकते मग 2004 मध्ये भारताच्या नागरिक, राजीव गांधींच्या पत्नी, लोकसभेवर निवडून आलेल्या सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
ते म्हणाले, "2004 मध्ये यूपीएला बहुमत होतं त्यावेळी सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव मीच पुढे ठेवला होता.त्यांच्या परदेशी वंशाचा त्यावेळी कोणताही विषय नव्हता असं माझं मत होतं."
 
त्यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं तर शरद पवार यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्र द्यायला हवी होती असंही आठवले यांनी म्हटलं.
 
"शरद पवार लोकनेते असल्याने पंतप्रधानपदासाठी ते अधिक योग्य होते.मनमोहन सिंह यांच्यापेक्षा त्यांना संधी द्यायला हवी होती. यामुळे काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती." असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.