1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:01 IST)

‘पांढरी चिप्पी’ला ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित

pandhari chippi
राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे देशातील पहिले राज्य : सिंधुदुर्गातही मोठय़ा प्रमाणात आढळतो वृक्ष
 
कांदळवने समुद्र किनाऱयांचे लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते. कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी ‘पांढरी चिप्पी’ (सोनेरेशिया अल्बा) या वृक्षास राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत करण्यात आले आहे. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
 
समुद्र किनाऱयाच्या भरती आणि ओहोटीच्या मधल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवणाऱया वनस्पतींना चिपीचे वन किंवा कांदळवन या नावाने ओळखले जाते. समुद्र किनाऱयाच्या भूभागाचे तसेच तिथल्या सर्व प्रकारच्या सजीवसृष्टीचे संरक्षण आणि अस्तित्व टिकून राहण्यासाठी कांदळवने खूपच महत्वाची भूमिका बजावतात.
 
किनारपट्टी भागात सर्वदूर आढळतो वृक्ष
 
आपल्या राज्याला 720 कि. मी. ची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हय़ात हे क्षेत्र आहे. देशातील कांदळवनांच्या एकूण प्रकारापैकी सुमारे वीस प्रकार आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवर दिसून येतात. या वीस प्रजातींपैकी पांढरी चिप्पी ही एक प्रजाती आहे. सोनेरेशिया अल्बा हा कांदळवनवृक्ष स्थानिक पातळीवर पांढरी चिप्पी या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष दुर्मिळ नसला, तरीही राज्याच्या किनारपट्टीभागात सर्वदूर आढळतो. पांढऱया चिपीची फुले संगधी असून मधमाशा, कीटक व पक्षांना आकर्षित करात. पांढरी चिप्पी या वृक्षास कांदळवन कक्ष व मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषीत करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून नुकतीच घोषणा केली आहे. अशाप्रकारे घोषणा करणारे महाराष्ट्र हे दशातील एकमेव राज्य आहे.