गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

एसटीकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सेवा, कॉल सेंटर ‘फेसबुक पेज’ सेवा

प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या त्वरित सोडविण्यासाठी एसटी महामंडळाकडून लवकरच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सेवा सुरू केली जाणार आहे. त्यावर कामही सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.महामंडळाकडून बंद पडलेले ‘फेसबुक पेज’ही सुरू केले जाईल. गेल्या चार वर्षांपासून नुसतीच चर्चा असलेल्या अद्ययावत अशा कॉल सेंटरचे उद्घाटन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले. 
 
एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात साधारण आठ वर्षांपूर्वी १८००२२१२५० टोल फ्री हेल्पलाइनचे कार्यालय सुरू करण्यात आले. दूरध्वनीवर प्रवाशांच्या येणाऱ्या तक्रारींची या हेल्पलाइनद्वारे लेखी नोंद घेण्यात येत असे. मात्र लेखी नोंद ठेवतानाच कर्मचाऱ्यांची दमछाक होत असे. अखेर अद्ययावत अशा कॉल सेंटरवर काम पूर्ण करून गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
 
कॉल सेंटर सुरू करतानाच एसटी महामंडळाकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेज तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एखाद्या बसची स्थिती, आगार आणि स्थानकामंध्ये असलेली दुरवस्था इत्यादींचे फोटो काढून प्रवाशांना ते एसटीच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेजवर टाकता येतील. त्यासोबतच असलेली माहिती अथवा तक्रारींचीही दखल घेऊन संबंधित विभागाला पाठवण्यात येणार आहे.