एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने हा संप कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्मचाऱ्यांकडून आत्महत्येसारखं (Suicide) टोकांच पाऊल उचलले जात असताना एका एसटी कर्मचाऱ्याचं हृदविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. सांगलीतील राहत्या घरी या कर्मचाऱ्याचं निधन झालं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील असे मृत्यू झालेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.राजेंद्र पाटील हे सांगलीतील आपल्या राहत्या घरी असताना आज (गुरुवार) सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप आणि त्यातच सुरु करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाई या सर्वांमुळे राजेंद्र चिंतेत असल्याचे बोललं जात आहे.
राज ठाकरेंचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडल्या.एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली.जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो.त्यामुळे तुम्ही आत्महत्येचं सत्र थांबवा अशी अटच राज ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली आहे.