बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (20:17 IST)

स्टॅन स्वामी: 'लोकांमध्ये राहाण्यासाठी चर्चची बंधने झुगारणारा फादर'

सौतिक बिस्वास
काही तासांपूर्वी फादर स्टॅन स्वामींचं निधन झालं. भीमा कोरेगावप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
 
ऑक्टोबर 2020 मधल्या एका संध्याकाळी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे काही अधिकारी रांचीतल्या एका पांढऱ्या इमारतीच्या बाहेर गोळा झाले होते.
 
त्या इमारतीत राहाणाऱ्या 83 वर्षांचे वृद्ध ख्रिश्चन धर्मगुरू तसंच आंदोलक असणाऱ्या स्टॅन स्वामींना त्यांनी अटक केली. अधिकाऱ्यांनी स्टॅन स्वामींचा मोबाईल फोन जप्त केला आणि त्यांना सामान बांधायला सांगितलं.
 
त्यानंतर ते स्वामींना घेऊन विमानतळावर गेले आणि मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले. मुंबईत स्टॅन स्वामींना अटक झाली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
भारतात दहशतवादाचा आरोप असणारे सर्वांत वृद्ध व्यक्ती स्टॅन स्वामी होते. स्वामी यांचा 5 जुलै 2021 ला वयाच्या 84 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्यांनी बांद्र्यातल्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
 
याआधी त्यांना तब्येतीच्या कारणावरून जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी सोमवारी, 5 जुलैला सकाळीच मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते, पण दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. फादर स्वामींना मे महिन्यातच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
 
फादर स्टॅन स्वामी एक जेसुआईट प्रिस्ट होते. एनआयएने स्टॅन स्वामी यांना 2018 साली झालेल्या भीमा-कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक केली होती.
 
2020 साली अटक होण्याच्या आधी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओत फादर स्वामी म्हणाले होते की "एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांची 15 तास चौकशी केली होती. अधिकाऱ्यांचा दावा होता माझा माओवाद्यांशी संबंध आहे असं दाखवणारी काही कागदपत्रं सापडली असं अधिकारी म्हणत आहेत."
 
"वय, ढासाळती तब्येत आणि कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे मला सारखं सारखं मुंबईत येणं शक्य नाही. तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या मनात नक्कीच 'माणुसकी' जागेल," असंही ते म्हणाले होते.
2018 पासून आतापर्यंत भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी केंद्र सरकारने आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. यात अभ्यासक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, वकील, सांस्कृतिक कार्यकर्ते, एक वयोवृद्ध कवी यांचा समावेश आहे. या कवी वरवरा राव यांना नंतर तुरुंगात कोव्हिड-19 ची बाधाही झाली. या सगळ्यांना सतत जामीन नाकारण्यात आलाय.
 
फादर स्वामी तपास यंत्रणांच्या रडारवर होतेच. त्यांच्या घरावर दोनदा धाडीही पडल्या होत्या असंही त्यांनी त्यांच्या व्हीडिओत म्हटलं होतं. त्यांचे माओवाद्यांशी संबंध आहेत असं अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
 
पण त्यांना ओळखणारे लोक म्हणतात की या मृदुभाषी जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्यात घालवलं.
 
ते 1991 साली झारखंडला स्थायिक झाले.
 
झारखंड राज्याची स्थापनाच तिथल्या आदिवासी लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी 2000 साली झाली. पण झारखंडच्या नशिबातले दुर्दैवाचे भोग चुकलेले नाहीत. या भागात माओवाद्यांच्या हिंसाचार आणि सततच्या दुष्काळ लोकांच्या पाचवीला पुजलेला आहे. इथली करती-सवरती माणसं दरवर्षी कामाच्या शोधात किंवा शिक्षणासाठी भारतात इतरत्र स्थलांतरित होतात.
भारतातल्या खनिजांपैकी 40 टक्के खनिजं झारखंडमध्ये सापडतात. यात युरेनिअम, बॉक्साईट, सोनं, चांदी, ग्रॅनाईट, कोळसा आणि तांबे अशा खनिजांचा समावेश होतो. पण या भागात म्हणावा तसा विकास झालेला नाही.
 
जो काही झाला तो इथल्या आदिवासींना विस्थापित करून झाला. झारखंडच्या 3 कोटी आदिवासांच्या हक्कांसाठी स्टॅन स्वामींनी सतत लढा दिला.
 
आदिवासींच्या हक्कांसाठी लढा
आदिवासींना आपले अधिकार काय आहेत हे कळावं म्हणून त्यांनी दुर्गम दुर्गम खेड्यांमध्ये गेले. या आदिवासींना ते सांगायचे की या खाणी, धरणं, गृहप्रकल्प त्यांच्या जमिनीवर त्यांच्या परवानगीशिवाय बांधले जातात. त्यांच्या जमिनी हिसकावल्या जातात आणि त्याच्यासाठी काही पैसेही मिळत नाही.
2018 साली आदिवासींनी आपल्या हक्कांसाठी जे बंड केलं त्यासाठी फादर स्टॅन यांनी आदिवासींना जाहीर सहानुभूती व्यक्त केली.
 
माओवादी म्हणून ठपका बसलेल्या 3000 आदिवासी स्त्री-पुरुषांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले.
 
मोठमोठ्या कंपन्या फॅक्टरी आणि कंपन्यांसाठी आदिवासींच्या जमिनी कशा रीतीने बळकावत आहेत याबद्दलही त्यांनी सतत लिहिलं.
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास 2 कोटी लोक स्वतःच्या जमिनीवरुन विस्थापित झाले आहेत. या जमिनी जलसिंचन प्रकल्प, कंपन्या, फॅक्टऱ्या आणि वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वापरल्या आहेत.
 
त्यांची प्रकृती गेली काही वर्षं ढासळत होती पण त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणं थांबवलेलं नाही. त्यांनी कॅन्सरवर मात केली. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. त्यांचे हात सतत थरथरायचे, त्यांना नीट जेवता यायचं नाही. त्यांना अन्न वाढून द्यावं लागायचं. त्यांच्यासमोर ठेवलेल्या कपातून त्यांच्या आवडत्या चहाचे स्ट्रॉने घुटके घेत राहायचे.
काही वर्षांपूर्वी भारतात जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या (लिंचिंग) विरोधात होणाऱ्या निदर्शनात ते आपल्या थरथरत्या हातात पोस्टर घेऊन उभे राहिले होते. "आपल्या कामाप्रति त्यांची इतकी अढळ निष्ठा होती," स्थानिक कार्यकर्ते सिराज दत्ता म्हणाले.
 
बेल्जियममध्ये जन्मलेले भारतीय अर्थशास्त्रज्ञ ज्यो द्रेंज यांनी फादर स्वामींचं वर्णन करताना म्हटलं की "ते मृदू आणि प्रामाणिक व्यक्ती होते. वक्तशीर, धर्मनिरपेक्ष आणि आपल्या कामाप्रति निष्ठा हे त्यांचे खास गुण होते."
 
"माओवाद्यांशी संबंध असणारे लोक किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या लोकांना त्यांनी मदत केली. झारखंडसारख्या ठिकाणी हे नवीन नाही. पण याचा अर्थ ते माओवादी होते असा होत नाही," द्रेंज म्हणतात.
 
सामाजिक कार्याची सुरूवात
फादर स्वामींच्या सामाजिक कार्याची सुरूवात ते मनिला (फिलिपिन्स) विद्यापीठात शिकत असतानाच झाली. फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांची क्रूर आणि भ्रष्टाचारी राजवट उलथवून टाकण्यासाठी लोकांनी आंदोलन केलं.
 
त्या आंदोलनातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं स्टॅन स्वामी यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं होतं.
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची भेट कडवे शिक्षणतज्ज्ञ पाऊलो फ्रेइरे यांच्याशी झाली.
 
पाऊलो फ्रेईरे ब्राझीलचे होते आणि शिक्षणात समीक्षेचा समावेश असावा या विचारांचे होते. भारतात आल्यानंतरही ते दक्षिण अमेरिकेतल्या चळवळींची माहिती घेत राहिले आणि त्याबद्दल प्रचंड वाचत राहिले.
 
तामिळनाडूत जन्मलेल्या स्टॅन यांचे वडील शेतकरी होते तर आई गृहिणी. त्यांनी उपेक्षित समुदायांच्या नेत्यांना शिकवण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेत काम केलं आणि दशकभराहून अधिक काळ त्या संस्थेचं नेतृत्वही केलं.
 
त्यांचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते झेवियर डिआज त्यांच्याविषयी म्हणतात, "स्टॅन यांच्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माणसं महत्त्वाची होती. त्यांनी लोकांसोबत राहाण्यासाठी, काम करण्यासाठी चर्चची बंधनंही तोडून टाकली."